... गुंवणूकीची वेळ झाली | Diwali 2024

सर्व प्रथम तुम्हा सर्वांना आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!

येणारे संवत्सर तुमच्यासाठी यशदायी आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना... 

अर्थात सगळंच त्या भगवंतावर टाकून चालणार नाही, आपल्यालासुद्धा काही प्रयत्न करावे लागतीलच, तर आज लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर संध्याकाळी ६ ते ७ या वेळात भारतीय शेअर बाजार एक तास मुहूर्त ट्रेडिंग सेशन सुरु असेल त्या वेळात बरेच व्यापारी, गुंतवणूकदार पुढील वर्षासाठी गुंवणूक करतात. अशा खास प्रसंगी गुंतवणूक करण्याचा फायदा हा असतो कि, त्यात फक्त आर्थिक नाही तर मानसिक गुंवणूक होते आणि आपण सहजसहजी ती विकण्याचा विचार करत नाही. म्हणून माझी आपण सर्वांना विनंती असेल कि आजच्या दिवशी आपण किमान एक हजार ते अगदी एक लाखा पर्यंत गुंवणूक करण्याचा विचार करू शकता. 


आजच्या घडीला गुंतवणुकीचे चांगले पर्याय कोणते ते समजून घेऊया. 

सोनं 

माझी या आधीची सोने खरेदी विषयीची मतं फारशी सकारात्मक नव्हती, परंतु काळानुसार बदलणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर एकूणच जागतिक हालचाली - Ukraine -Russia, Iran -Israel यांच्यातील युद्ध, चीन आणि भारताचा डॉलर सोडून स्वतःच्या चलनात सुरु झालेला व्यापार, जागतिक मंदी, अमेरिकेतील निवडूक या आणि अश्या अनेक कारणांनी जगभरातील मोठ्या देशांनी सुरु केलेली सोने खरेदी सध्या सोन्याचा भाव वर वर घेऊन जात आहेत. मला बाकीच्या कारणांमध्ये फारसा रस नाहीये पण पुढील वर्षी जगाचा आर्थिक विकास दर हा थोडा कमी होईल आणि शेअर बाजार मधून १८ ऐवजी केवळ १२-१४ टक्के फायदा मिळेल असं वर्तवलेलं भाकीत मला काही प्रमाणात योग्य वाटतं. 

सोनं खरेदी करण्याचा सल्ला देण्यामागे दुसरं कारण म्हणजे मी हा उपक्रम गेली ६ वर्ष राबवत आहे, या ग्रुपमध्ये अनेक मंडळी आहेत जी गेली ३-४ वर्ष माझ्या सोबत शेअर मध्ये गुंवणूक करत आहेत, जर तुम्ही त्यापैकी एक असाल आणि तुम्ही शेअर व्यतिरिक्त इतर कुठेच गुंतवणूक केली नसेल तर ते काहीस योग्य नाही. Diversification म्हणून आपल्या भांडवलाचा (Capital) काही भाग इतर ठिकाणी गुंतवायलाच हवा - जर तुम्ही याआधी सोने खरेदी केले असेल (दागिन्यांना गुंतवणूक समजू नका, वळी, नाणी, बिस्कीट, डिजिटल स्वरूपातील सोने हेच गुंवणूकीचं रूप आहे) जर तुमच्या पोर्टफोलीच्या किमान ८% हुन अधिक सोने तुमच्याकडे असेल तर तुम्ही सोने खरेदी करणे टाळू शकता. 

आज जर सोने खरेदी करायचे असेल तर वळी, नाणी अथवा GOLD ETF (Exchange Traded Fund) म्हणजेच एक प्रकारचा सोन्याचा mutual fund यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. SBI Gold ETF हा भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात नामवंत ETF आहे. 

Value Research -  SBI ETF

आता येऊया शेअर्स कडे. नेहमी प्रमाणे मी तुमच्या समोर २ नावं ठेवतं आहे - तुम्ही त्याचा अभ्यास करून तुमच्या पसंतीची कंपनी निवडा


पुढील एका वर्षासाठी -

Arrow Greentech  Ltd. 

Packaging आणि Cyber Security क्षेत्रात काम करणारी हि एक स्मॉल कॅप कंपनी आहे, साधारण एक वर्ष ट्रॅक केल्यावर मी ४ महिन्यांपूर्वी या कंपनी मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. ३६ हुन अधिक पेटंट मिळवणारी हि कंपनी अमेरिका आणि युरोप मधील ४ मोठ्या देशात देखील व्यापार करते. यांच सर्वात जास्त वापरला जाणारं उत्पादन म्हणजे Water soluble strip/film - औषधांमध्ये खासकरून capsule बनवण्यामध्ये याचा सर्वात जास्त उपयोग होतो. सुरुवातीची अनेक वर्ष R&D मध्ये खर्च केल्यावर या कंपनीने आता अतिशय उत्तम रित्या त्याचा विक्री (Revenue) आणि नफ्यात (प्रॉफिट) मध्ये रूपांतर करायला सुरुवात केली आहे. मी सोबत Tijori Finance वरील कंपनीच्या प्रोफाईलची आणि इन्व्हेस्टर प्रेसेंटेशनची लिंक जोडत आहे. माझी नम्र विनंती आहे तुम्ही स्वतः एकदा हे दोन्ही नीट वाचून बघावं आणि स्वतः निर्णय घ्यावा. 

Investor Presentation

Tijori Finance


पुढील तीन ते पाच वर्षांसाठी -

Zomato Ltd. 

या कंपनी विषयी काय काय लिहू असा प्रश्न पडतो, अतिशय उत्तम Sales, प्रॉफिट, Balance Sheet, मॅनेजमेंट, भविष्यातील संधी सगळंच काही उत्तम आहे. अर्थात कंपनी समोर मोठे प्रश्न देखील आहे, ते सुद्धा लक्षात घेतले पाहिजेत, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी डिलिव्हरी पार्टनर्सनी घोषित केलेला संप, वाढती स्पर्धा, किराणा आणि हॉटेल व्यावसायिकांचा वाढता रोष, सरकारी GST नोटीस, इ. पण अडचणी सगळी कडेच आहेत, पण "Value Addition" नावाची जी गोष्ट zomato ला जमते त्याला मरण नाही,Swiggy आणि Zepto ला उत्तर म्हणून ८५०० कोटींचा काढलेला QIP (capital raising activity), zomato ने नुकतीच Platform फी ६ रुपयांवरून १० रु. केली X वर त्यावर काहींनी निषेध नोंदवला पण त्यापेक्षा जास्त काही झालेच नाही, त्यातून दिसलेली pricing power - अशा काही दीर्घकालीन गोष्टी झोमॅटो कडे आहेत. 

मला  पुन्हा पुन्हा एक गोष्ट सांगावीशी वाटते झोमॅटोची सर्वात मोठी जमेची बाजू त्यांचं कुकी कटर मॉडेल. म्हणजे काय? तर काही असे व्यवसाय असतात जे एक प्रकारचा प्रॉडक्ट बनवतात आणि त्याच्या आवृत्त्या काढून जास्त खर्च न करता पैसे कमवतात - छापाचे गणपती, जे coke ने केलं, जे McD ने केलं, जे काही प्रमाणात Maruti उद्योग आणि नंतर टाटा उद्योग समूहाने केलं तेच झोमॅटो करतंय. झोमॅटोचा एक लॉयल ग्राहक आहे, त्याला ते फक्त हॉटेलचं खाणं नाही आणून देतं, तर ते त्याला जीवनावश्यक वस्तू आणून द्यायला लागले (BlinkIt) मग त्याला त्यांनी concert आणि Pictureची तिकीटं द्यायला सुरुवात केलीय  (Paytm/District), पुढे ते कदाचित (Travel agency) हॉटेल बुकिंग देतील, (Ed -Tech) education देतील, नोकरी शोधून देतील (Placement Agency) - हे सगळं झालं front end - आपल्याला दिसणारं - आपल्यानं न दिसणाऱ्या अनेक गोष्टी झोमॅटो करतंय जसं की - झोमॅटो Hyperpure नावाच्या व्यवसायाअंतर्गत हॉटेलला लागणारे जिन्नस विकतात, त्यांना staffing सोलुशन देतात, त्यांना branding, legal, accounting अश्या अनेक सेवा पुरवतात. त्यामुळे ते उतरतील त्या क्षेत्रात एकदा जम बसवला तर आजूबाजूच्या व्यवसायांमद्ये हात पाय पसरायला लागतात - माझ्या most bullish scenario नुसार मला झोमॅटो टाटा उद्योग समूहाच्या तोडीचा उद्योग समूह होऊ शकतो अशी आशा वाटते. fingers crossed   - सोबत मी झोमॅटो Tijori Finance लिंक देतोय तुम्ही स्वतः जरून अभ्यास करा.

Tijori Finance - https://www.tijorifinance.com/company/zomato-ltd/

मागच्या दिवाळीला मी दोन शेअर्स विषयी लिखाण केलं होतं - त्या दिवसापासून आज पर्यंत म्हणजे एका वर्षात - त्यातला एक शेअर ९७% वर गेला तर दुसरा २१% खाली पडलाय - त्यामुळे जे वाचताय त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका समजून उमजून घ्या आणि विचारपूर्वक निर्णय घ्या 


कुठेही करा पण थोडी गुंवणूक जरूर कराच.

पुन्हा एकदा शुभ दिपावली. 

 - चिन्मय 

Comments